या भारतात बंधु - भाव नित्य वसू दे
या भारतात बंधु-भाव नित्य वसू दे ।
दे वरचि असा दे ।।
हे सर्व पंथ - संप्रदाय एक दिसू दे ।
मतभेद नसू दे ।।धृ0।।
नांदोत सुखे गरिब-अमिर एकमतानी ।
मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी ।
स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे ।
दे वरचि असा दे ।।१।।
सकळांस कळो, मानवता, राष्ट्रभावना ।
हो सर्वस्थळी मिळूनि, समुदाय-प्रार्थना ।
उद्योगि तरुण वीर, शीलवान दिसू दे ।
दे वरचि असा दे ।।२।।
हा जातिभाव विसरुनिया एक हो अम्ही ।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी ।
खळ-निंदका-मनीही, सत्य न्याय वसू दे ।
दे वरचि असा दे ।।३।।
सौंदर्य रमो घरघरांत स्वर्गियापरी ।
ही नष्ट होऊ दे विपत्ति, भीती बोहरी ।
तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसूदे ।
दे वरचि असा दे ।।४।।
No comments:
Post a Comment